
लोकसभा निवडणुकीत मिंधे गट आणि भाजपकडून धनशक्तीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला गेला होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही पैसे वाटप केले जात आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात सभा झाली. सभेला उपस्थित शिक्षकांना त्या सभेनंतर पैसे वाटले गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तो व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर करत कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल उपस्थित केला.
शिंदे यांची नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी जळगावमधील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. त्या सभेनंतर मिंधे गट शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.






























































