भाजप नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनावश्यक वक्तव्ये टाळावीत; पंतप्रधान मोदींनी नेत्यांना झापले

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भाजप आणि एनडीएतील अनेक नेते वादग्रस्त आणि अनावश्यक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे पक्षाची चांगलीच गोची होत आहे. त्यामुळे याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी भाजप नेत्यांना चांगलेच झापले आहे. भाजप नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, असे आदेशच त्यांनी दिले आहेत. दिल्लीत एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेत्यांना अशा वक्तव्यांबाबत फटकारले आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि संबंधित मुद्द्यांवर भाजप नेत्यांनी अनुचित वक्तव्ये टाळणे गरजेचे आहे. पक्षाच्या सदस्यांच्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे जनतेचा रोष आणि कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रताधांनी नेत्यांना अशी वक्तव्ये करण्याबाबत चांगलेच झापले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत काही भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला सर्व स्तरातील टीकेला तोंड द्यावे लागले होते.

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत सशस्त्र दलांचा चेहरा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आहेपार्ह वक्तव्य केले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयानेही या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला. तसेच भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. शाह यांनी एका कार्यक्रमात कर्नल कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. त्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांवर टीका केली. त्यांनी दहशतवाद्यांकडे क्षमायाचना करण्याऐवजी त्यांनी प्रतिकार करायला हवा होता, असे ते म्हणाले. या महिलांमध्ये वीरता, उत्साह आणि उत्साह नसल्याने त्या बळी पडल्या, असे खासदार म्हणाले होते. या व्कतव्यावरून वाद निर्माण होताच महिलांनी दहशतवाद्यांशी लढावे अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे ते म्हणाले. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे भाजप अडचणीत येत असल्याने पंतप्रधानांनी अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना चांगलेच झापले आहे.