IMD Rain Alert : मॉन्सूनचे मुंबई, पुण्यात जोर’धार’ आगमन, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नैऋत्य मान्सूनने नवीन विक्रम नोंदवत महाराष्ट्रात 12 दिवस आधीच ‘एण्ट्री’ केली आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाचा मॉन्सून सोमवारी कोकणातील मुंबईपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे व सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीची उत्तरसीमा सध्या मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, मेहबूबनगर, कावली, अगरताला आणि गोलपाडा येथून जात आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापेल, तर पुढील सहा ते सात दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुसळधार पावसाची शक्यता असलेले जिल्हे

मॉन्सूनच्या आगमनासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर; मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, जळगाव; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया यांचा समावेश आहे.