
इस्त्रायलने रविवारी मध्यरात्री गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. यातील एका हल्ल्यात शरणार्थी शिविर म्हणून वापरल्या जाणाऱ्या किंडरगार्टन शाळेवर इस्त्रायलने बॉम्बहल्ला केला, ज्यात 30 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात शाळेला आग लागल्याने अनेक जण जिवंत जळाले.
मृतांमध्ये रेड क्रॉसचे दोन कार्यकर्ते, एक पत्रकार आणि अनेक मुले यांचा समावेश आहे. ‘अल जझीरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यांमुळे 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यावर स्पेनने जगभरातील देशांना इस्त्रायलवर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्त्रायलने गाझाच्या 77 टक्के भागावर ताबा मिळवला आहे. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने इस्त्रायलवर नरसंहाराचा आरोप करत संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.