
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील शवागृहाबाहेर भरपावसात एका मृत्यूदेहाची हेळसांड झाल्याचा गंभीर व संवेदनशील प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या जिल्ह्यातच घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच, वैद्यकीय अधीक्षकांकडून यावर सारवासारव करण्यात आली.
रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच असलेल्या शवागृहासमोर स्ट्रेचरवर कापडात गुंडाळलेला एक मृतदेह बराच वेळ बाहेर ठेवण्यात आला होता. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे सुमारे एक तासाहून अधिक काळ हा मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब झाल्याचे पाहून जागरूक नागरिकांनी मोबाईलवरून याचे चित्रीकरण सुरू केले. याची कुणकुण लागल्यानंतर सीपीआर प्रशासन जागे झाले. गेटवरच कडेकोट सुरक्षारक्षक तैनात असतानासुद्धा त्यांचेही लक्ष या मृतदेहाकडे गेले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱयांनी भर पावसातच हा मृतदेह बाजूला शववाहिकेच्या आडोशाला नेऊन ठेवला.
दरम्यान, मृतदेह पावसात असल्याची कबुली देत वैद्यकीय कपडय़ाने बंदिस्त केल्यामुळे तो भिजला नाही. तसेच त्याची कसलीही हेळसांड झाली नसून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने यांनी सांगितले.