
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात येणाऱ्या रेवदंडा येथील कोरलाई समुद्रामध्ये एक संशयित बोट आढळून आली आहे. समुद्रात तीन नॉटिकल मैल (जवळपास साडे पाच किलोमीटर) दूर अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी होती. या बोटीवर पाकिस्तानशी संबंधित चिन्ह असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून भारतीय तटरक्षक दल आणि पोलीस अलर्ट झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी रडारने ही बोट पकडली आहे. मात्र वादळी वारे, पाऊस यामुळे बोटीपर्यंत पोहोचणे सध्या शक्य झालेले नाही. नौदल आणि तटरक्षक दलाचे पथक बोटीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहेत. मुरुड तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जमधून या संशयास्पद बोटीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र खराब हवामानामुळे यात अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रायगड पोलीस, बॉम्ब शोधक पथक, नौदल आणि तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून सर्व परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. रायगड पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. नागाव येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेले आहे
भीतीचं वातावरण
कोरलाई, रेवदंडा आणि आजपासच्या किनारी भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि त्याचे साथिदार कराचीहून समुद्रामार्गेच मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी ताड हॉटेलसह मुंबईतील प्रमुख ठिकाणी हल्ला करून 166 जणांचा जीव घेतला होता. तसेच जम्मू-कश्मीर येथील पहलगाम येथे नुकताच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 माता-भगिनींचे कुंकू पुसले होते. यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. अशा स्थितीत समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद पाकिस्तानी बोट आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.