
बुद्धिबळ जगतातला अव्वल नंबर खेळाडू मॅग्नस कार्लसनने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवताना सर्वात वेगवान फॉरमॅटमध्ये आपला करिश्मा दाखवला. त्याने सर्वाधिक 22.5 गुण संपादत सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झचे संयुक्त जेतेपद स्वतःच्या नावावर केले. या स्पर्धेत हिंदुस्थानचा दोम्माराजू गुकेश 19.5 गुणांसह तिसरा आला. अमेरिकेचा वेस्ली सो दुसरा आला.
गेले काही महिने बुद्धिबळात कार्लसन आणि गुकेश यांच्यात चांगलाच संघर्ष रंगताना दिसतोय. या वेगवान स्पर्धेतही दोघांनी आपला सर्वोच्च खेळ दाखवला. रॅपिड प्रकारात कार्लसनवर मात करणाऱया गुकेशला ब्लिट्झ प्रकारात कार्लसनकडून मात खावी लागली तर एक डाव बरोबरीत सुटला. कार्लसनने आपले अव्वल स्थान कायम राखत 40 हजार डॉलर्सचा पुरस्कार जिंकला तर गुकेशला 25 हजार डॉलर्सचा पुरस्कार लाभला.

























































