
बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरपर्यंत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात एसआयआरला जोरदार विरोध सुरू असताना निवडणूक आयोगाने ज्या मतदारांची नावे हटवली आहेत. बिहारमधील पाटणा, मधुबनी आणि पूर्व चंपारण या तीन जिह्यांत तब्बल 10.63 लाख मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे 18 ते 40 वर्षांतील मतदारांची नावे सर्वात जास्त हटवण्यात आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या तीन जिह्यांतील एकूण 10.63 लाख मतदारांची नावे हटवली आहेत. हे राज्यातील 38 जिह्यातील एकूण 65 लाख नावे कमी केलेल्या संख्येपैकी 16.35 टक्के भाग आहे. हे तीन जिल्हे राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. बिहारमधील एकूण 243 विधानसभा क्षेत्रांपैकी या तीन जिह्यांत एकूण 36 मतदारसंघ आहेत. 2020 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूने 36 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी महागठबंधन सरकारला 14 जागा जिंकण्यात यश आले होते. 40 वर्षांपैकी कमी वयाच्या मतदारांची नावे हटवण्यात आली असून ही संख्या 4.2 लाख इतकी आहे. या तिन्ही जिह्यांतील पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची नावे अधिक हटवण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची नावे हटवण्यात आली आहेत त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होणाऱ्यांची संख्या 3.9 लाख आहे. पाटण्यात सर्वात जास्त 3.95 लाख मतदारांची नावे हटवली आहेत. पाटणा जिह्यात 14 विधानसभा मतदारसंघ असून यात सर्वात जास्त महिलांची नावे हटवण्यात आली आहेत. मधुबनीमध्ये 3.52 लाख मतदारांची नावे हटवली आहेत. मधुबनी जिह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. पूर्व चंपारण जिह्यात 3.16 लाख मतदारांची नावे हटवली आहेत. या जिह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.