
निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”सत्ताधारी पक्षाचे आमदार मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत बोलत आहेत. मंदा म्हात्रे, संजय गायकवाड यांनी दुबार मतदारांबाबत प्रश्न केलेयत. हे प्रश्न आम्ही नाही उपस्थित केले तर सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी केले आहेत. असे असतानाही निवडणूक आयोग काही बोलत नाही. त्यांच्या कानाचे पडदे फाटले आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
”भाजपने मतदार यादीत घोटाळे केले ते आम्ही पुराव्यासहीत समोर आणले. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केल्यावर आयोगानं उत्तर द्यावं. निवडणूक आयोगाने भाजपच्या नेत्यांना वकील म्हणून नेमलं आहे का? निवडणूक आयोग, भाजप व भाजपचे बगलबच्चे यांनी एकत्र हातात हात घालून काम करतं. त्यांची पार्टनरशिप आहे. त्या पार्टिनरशीपमधून त्यांनी विधानसभेत विजय मिळवला. आतापर्यंत हजारो दुबार नावं आम्ही समोर आणलीयत. आता मतदारांची यादी समोर आणणार का हा प्रश्न त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंना विचारायला हवं. त्यांच्या मतदारसंघात ऐरोली व बेलापूरमध्ये मिळून सत्तर हजार मतं दुबार आहेत. हे पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी नावं टाकली हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. नाशिकमध्ये तीन लाख दुबार मतदार आहेत. सत्ताधाऱ्यांना काही अक्कल आहे का? विलास भुमरे सांगतात की मी वीस हजार मत बाहेरुन आणली. यांच्या कानाचे पडदे फाटले आहेत का? असे संजय राऊत म्हणाले.