
एका तरुणाला रील बनवणे जीवावर बेतले आहे. तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून फोडल्याने त्याचा जबडा फाटला आहे. तसेच चेहराही होरपळला आहे. उपचारासाठी त्याला रतलामला पाठवण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी झाबुआ जिल्ह्यातील पेटलावड पोलीस स्टेशन परिसरातील बाछिखेडा गावात घडली आहे.
एक तरुण तोंडात फ्यूज बॉम्ब ठेवून तो फोडत होता. त्याने एकामागून एक सात बॉम्ब फोडले होते. आठवा बॉम्ब फोडताना त्याच्याकडून एक चूक झाली आणि त्याचा जबडा फाटला. या अपघातात रोहितचा चेहरा भाजला आहे. स्वतःला हिरो सिद्ध करण्यासाठी, 18 वर्षांचा रोहित गावातील काही मुलांसमोर तोंडात फ्यूज बॉम्ब ठेवून तो पेटवण्याचा पराक्रम वारंवार दाखवत होता. अपघातानंतर लोकांनी त्याला पेटलावड रुग्णालयात दाखल केले. त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला रतलाम जिल्हा रुग्णालयात रेफर केले. रोहित वारंवार बॉम्ब तोंडात घेऊन फोडत होता. सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पेटलावड रुग्णालयाचे बीएमओ डॉ. एमएल चोप्रा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या जबड्याला पूर्णपणे दुखापत झाली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर खोलवर जखम झाली आहे. सारंगी पोलिस स्टेशनचे प्रभारी दीपक देवरे यांनी या घटनेला तरुणाच्या निष्काळजीपणाचे कारण सांगितले. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी तरुणांनी असे धोकादायक पाऊल उचलू नये असे आवाहनही यावेळी करण्यात आले.