बलात्काऱ्याची केली हत्या; पीडितेची जन्मठेप रद्द; हायकोर्टाने ठोठावली दहा वर्षांची शिक्षा

बलात्काऱयाची हत्या करणाऱया पीडितेची जन्मठेपेची शिक्षा रद्द करत उच्च न्यायालयाने तिला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली.
लग्नाचे आमिष दाखवून तो पीडितेवर अत्याचार करत होता. नंतर बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेवर दबाव टाकत होता. त्याच रागात पीडितेने त्याची हत्या केली. सत्र न्यायालयाने पीडितेला यासाठी दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याविरोधात पीडितेने अपील याचिका दाखल केले.

न्या. उर्मिला जोशी-फाळके व न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या अपील याचिकेवर सुनावणी झाली. हत्या करण्याचा पीडितेचा हेतू नव्हता. ही घटना अचानक घडली आहे. त्यामुळे हत्ये प्रकरणी ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली जात आहे. सदोष मनुष्य वधाच्या गुह्यासाठी दहा वर्षांची शिक्षा दिली जात आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

20 वर्षांनी निकाल

2005मध्ये सत्र न्यायालयाने पीडितेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याला पीडितेने याचिकेद्वारे आव्हान दिले. या अपिलावर उच्च न्यायालयाने तब्बल 20 वर्षांनी निकाल दिला.

शरण येण्याचे आदेश

पीडितेने दहा वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी शरण यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने पीडितेला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.