
पुणे पोलिसांनी बोपोडी जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचे बिझनेस पार्टनर आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील तसेच शीतल तेजवानी या दोघांना क्लीन चिट दिली आहे. गैरसमजातून बोपोडी प्रकरणात त्यांची नावे गुह्यात नोंद करण्यात आल्याचे पोलीस म्हणाले. यामुळे पुणे पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आणि अन्य 9 जणांनी बोपोडीतील 5.3 हेक्टर सरकारी जमीन कुळवहिवाटीची असल्याचे दाखवून हडपल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार दिग्विजय पाटील, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांच्यासह 9 जणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या जमीन प्रकरणात तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा संबंध नसल्याचे नमूद करत पोलिसांनी आज त्यांना क्लीन चिट दिली.
अटकेचा प्रश्न टोलवला
मुंढवा जमीन घोटाळ्यात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी नमूद केले. आतापर्यंत या जमीन घोटाळ्यात आरोपींना अटक का करण्यत आली नाही, या प्रश्नावर कागदपत्रे तपासासाठी मागवली आहेत, इतकेच उत्तर पोलिसांनी दिले.
चौकशी सुरू होण्याआधीच
अमेडिया कंपनीने मुंढवा येथील 1800 कोटी किमतीची 40 एकर जमीन 300 कोटींत पदरात पाडून घेतली. ओरड झाल्यानंतर हा व्यवहार रद्द केला असून याप्रकरणी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चौकशीसाठी पुण्यात दाखल होत असतानाच बोपोडी प्रकरणात दिग्विजय पाटील आणि तेजवानीला क्लीन चिट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



























































