अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे; शब्दच नाहीत, आदित्य ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे; शब्दच नाहीत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून उड्डाण घेतलेले त्यांचे विमान बारामतीत लँडिंग दरम्यान कोसळले. यात अजित पवारांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.

अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे; शब्दच नाहीत. दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.