
मानखुर्द येथील सिग्नलचा अडसर दूर झाल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर सुसाट येणारी वाहने, नव्याने खुला झालेला विक्रोळी उड्डाणपूल आणि त्या जोडीला ईस्टर्न फ्री वे ते ठाणे साकेत येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे विक्रोळी ते भांडुपदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनावर मोठा ताण येत आहे.
मुंबई शहर व उपनगरांना ठाण्याशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून रोज लाखो वाहनांची वाहतूक या मार्गावरून होते. रोज लाखो वाहनांना विक्रोळी गोदरेज येथे सिग्नल लागतो, पण हा सिग्नल अल्पकाळच असतो. त्यानंतर वाहने थेट ठाण्याच्या दिशेने येऊ लागतात. याव्यतिरिक्त विक्रोळी पूर्व आणि पश्चिम जोडणारा नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे त्याही ठिकाणची वाहने महामार्गावर आल्यानंतर वाहतूककोंडी होते.
n विक्रोळीचा नवीन उड्डाणपूल आणि साकेतदरम्यान प्रस्तावित असलेला नियोजित पूल यामुळे वाहतूककोंडी होत असून ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका मिळेल, तोपर्यंत वाहनचालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी मनुष्यबळात वाढ
येथील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी जेथे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले तेथील बॅरिकेड्स हटवले आहेत. जेव्हीएलआर उड्डाणपूल जेथे संपतो तेथील बॅरिकेड्सही आत घेण्यात आले आहेत. काही ठिकाणी वाहतूक सेवा रस्त्यांवर वळविली आहे. शिवाय वाहतूककोंडी टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मनुष्यबळातही वाढ केली आहे, असे वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.



























































