
UK07 रायडर म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय YouTuber अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहेत. अनुराग डोभाल यांचे कौटुंबिक कलह सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये चर्चेत आहेत. दरम्यान, अनुरागच्या नुकत्याच झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अनुराग सोशल मीडियावर लाईव्ह असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही काळापूर्वी अनुराग डोभाल इंस्टाग्रामवर लाईव्ह होता. या दरम्यान तो खूप अस्वस्थ होता आणि त्याच्या कौटुंबिक वादाबद्दल बोलत होता. या लाईव्हमध्ये तो त्याच्या आईला म्हणाला, ‘आई, पुढच्या वेळी मी जन्माला येईन तेव्हा कृपया मला प्रेम दे.’ यासोबतच त्याने त्याचा भाऊ कलाम याला यासाठी जबाबदार धरले. या लाईव्ह दरम्यान त्याची गाडी खूप वेगाने जात होती आणि तो स्वतः वारंवार स्वतःचा जीव घेण्याबद्दल बोलत होता. लाईव्ह व्हिडिओच्या शेवटी तो म्हणाला, ‘आणि हा माझा शेवटचा निरोप आहे’ आणि हे बोलल्यानंतर त्याने त्याची गाडी क्रॅश केली. या अपघातात अनुराग जखमी झाला.
अनुरागच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे त्याचे चाहते खूप दुःखी झाले आहेत. अनुरागला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी, त्याच्या शरीरावर फक्त किरकोळ ओरखडे पडले आहेत. लाईव्ह व्हिडिओ दरम्यान, त्याने स्वतःचा जीव घेण्याबद्दल बोलले आणि हा अपघात आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे समजले जात आहे. जवळच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, तो सध्या उपचार घेत आहे.
अनुराग डोभाल हा “बिग बॉस १७” मध्ये देखील स्पर्धक होता. तो एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, त्याच्या कुटुंबाने त्याला घराबाहेर काढले आहे आणि त्याचे सर्व पैसेही काढून घेतले आहेत. अनुरागने नुकतेच प्रेमविवाह केला होता, ज्यामुळे त्याचे कुटुंब नाराज झाले होते आणि त्याची पत्नी रितिका देखील त्याला सोडून गेली होती. अनुरागने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले आहे.





















































