
हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेसाठी आता ताडदेव सजले आहे. ताडदेव ते नानाचौक परिसरात या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून मार्गावरील रस्ते स्वच्छ आणि सुशोभित झाले आहेत. खड्डे बुजवून बेवारस वाहने हटवण्यात आली आहेत. मंदिरांना रोषणाई करण्यात येत आहे. तसेच या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी शेकडो गुढय़ा, तोरणे व भगवे ध्वज उभारण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना नेते अरविंद दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शिवसैनिक व जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शोभायात्रेसाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. या यात्रेत वारकरी दिंडी, महिलांचे लेझीम पथक, हलगी, ढोल-ताशे वाद्य, कोल्हापूरचा दांडपट्टा, कोकणच्या लोकजीवनातील रोंबाटसारखे विविध पारंपरिक खेळ या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर नाशिकचे आदिवासी नृत्य, त्यांची शिकारीची पद्धत सादर करणार आहेत. हनुमान, गणरायांच्या विशाल मूर्ती आणि छत्रपती शिवराय यांच्या अष्टप्रधान मंडळाचा देखावा या शोभायात्रेत मांडण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पथनाटय़ व देखावे शालेय विद्यार्थी सादर करणार आहेत. यात्रेच्या मुख्य मार्गावरील मंदिरांना रोषणाई करण्यात येणार असून ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. या भव्य यात्रेसाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले असून शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेला भेट देणार आहेत.
– अरुण दुधवडकर, आयोजक, शिवसेना उपनेते


























































