
इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष पेटला असून याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. या युद्धामुळे इराणला मोठ्या आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाने एक महत्त्वाचे आवाहन केले असून युद्धाने बाधित झालेल्या इराणी नागरिकांच्या मदतीसाठी थेट दूतावासात येऊन रोख रक्कम देणगी स्वरूपात देण्याची विनंती केली आहे.
दरम्याम इराणला मदत करण्यासाठी अनेक हिंदुस्थानी इच्छुक आहेत. मात्र त्यांना पैसे पाठवताना अडचणी येत आहेत. इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर याबाबत माहिती दिली आहे. अनेक हिंदुस्थानी नागरिक इराणला माणुसकी म्हणून मदत पाठवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि तांत्रिक कारणांमुळे इराणच्या बँक खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या गुगल पे (GPay) किंवा इतर ऑनलाइन माध्यमांचा वापर टाळून इच्छुक लोकांनी थेट दूतावासात येऊन रोख रक्कम जमा करावी, असे आवाहन इराणच्या दूतावासाने केले आहे.
यापूर्वी इराण दूतावासाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्याची माहिती शेअर केली होती आणि ऑनलाइन पैसे पाठवणाऱ्यांना व्हॉट्सॲपवर स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले होते. परंतु, बँकेच्या व्यवहारात वारंवार अडथळे येत असल्याने आता त्यांनी रोख रक्कम पाठवण्याचा पर्याय निवडला आहे. तसेच हिंदुस्थानी बांधवांनी दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल दूतावासाने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
हिंदुस्थान आणि इराणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी स्तरावर अत्यंत जुने संबंध आहेत. ऊर्जा क्षेत्र असो किंवा व्यापार, दोन्ही देशांनी नेहमीच एकमेकांना सहकार्य केले आहे. इराणमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक हिंदुस्थानी नागरिक, विशेषतः शिया समुदायातील लोक इराणला पाठिंबा दर्शवत आहेत. या कठीण काळात इराणच्या नागरिकांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी ही मदत वापरली जाणार आहे. तांत्रिक समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही दूतावासाने या संदेशात म्हटले आहे.
























































