
लोकमान्य टिळक टर्मिनसहून (एलटीटी) मडगावला जाणारी ट्रेन क्र. 11099 एलटीटी-मडगाव एक्सप्रेस सोमवारी रात्री सवाचार तास उशिराने मार्गस्थ झाली. कोकणात जाणाऱया प्रवाशांना सुरुवातीलाच रखडपट्टीचा मनस्ताप सहन करावा लागला. संपूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवरच घालवावी लागल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. हल्ली या गाडीला वारंवार विलंब होत असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.
कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेसला पर्यायी व्यवस्था म्हणून एलटीटी-मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. मात्र या गाडीच्या वेळेत बदल करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. कोकणातील अनेक गावांमध्ये अजूनही शिमगोत्सव सुरू आहे. त्यामुळे गावी ये-जा करणाऱयांची ट्रेनमध्ये मोठी गर्दी होत आहे. या प्रवाशांना सोमवारी रात्री सवाचार तास विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागला.































































