संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थानकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध, अफगाणिस्तानवरील हवाई हल्ले आणि निर्वासनावर चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानवर जोरदार टीका करत रमजान महिन्यात अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच अफगाण नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निर्वासनाबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली.

‘इस्लामोफोबियाविरोधी आंतरराष्ट्रीय दिवस’ निमित्त आयोजित संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यक्रमात हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथानेनी हरीश यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला. हिंदुस्थानचा पश्चिमेकडील शेजारी इस्लामोफोबियाच्या नावाखाली काल्पनिक कथा तयार करण्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या देशातील अहमदिया समुदायावर होणारे दडपशाही, अफगाण नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर निर्वासन आणि रमजान महिन्यातील हवाई हल्ल्यांना काय म्हणावे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हरीश यांनी पुढे सांगितले की, धार्मिक ओळख राजकीय हेतूंसाठी वापरण्याचा वाढता कल चिंताजनक आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी याची गंभीर दखल घ्यावी.

दरम्यान, अफगाणिस्तानकडून असा दावा करण्यात आला आहे की, काबूलमधील अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 250 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला सोमवारी रात्री झाला.

तालिबानचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सांगितले की, रात्री सुमारे 9 वाजता पाकिस्तानकडून ‘ओमिद अ‍ॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’ या 2000 खाटांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून बचाव पथके आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र पाकिस्तानने या आरोपांना फेटाळून लावत रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा “अवास्तव” असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.