
माजी महापौर अभिषेक कळमकर याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, आरोपीला त्वरित अटक न झाल्यास 25 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही पीडित महिलेने दिला आहे.
पीडितेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारीला माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत आरोपीने एमआयडीसी परिसर, विळद घाट तसेच शिरूर येथे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, आरोपीने पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास तोफखाना ठाण्याचे पोलीस निरीक्षक भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटूनही आरोपीला अद्याप अटक केली नसल्याने पीडित महिला व तिचे कुटुंब भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपीला तत्काळ अटक करून तिला व कुटुंबाला संरक्षण द्यावे, अन्यथा 25 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.





























































