
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात सर्वप्रथम इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर लारीजानी यांनीच अमेरिका विरुद्धच्या युद्धाची सूत्रे हाती घेतली होती. पण मंगळवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्यासह 300 सैनिक मारले गेले. अली लारीजानी यांच्या निधनानंतर संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या पुढील भूमिकेकडे आहे. असे असताना परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका मुलाखतीत देशाची स्थिती स्पष्ट केली आहे. लारीजानींसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने इराणच्या सरकार किंवा तिथल्या शासनव्यवस्थेवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणची व्यवस्था आजही तितक्याच कार्यक्षमतेने आणि योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराणची राजकीय संरचना ही केवळ एका नेतृत्वावर अवलंबून नाही, असे स्पष्ट करत अराघची यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या धोरणांवर आश्चर्य व्यक्त केले. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा राजकीय पाया अत्यंत मजबूत असून येथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संस्थांचे जाळे अतिशय घट्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही एका व्यक्तीच्या येण्याने किंवा जाण्याने पूर्ण व्यवस्था कोलमडणार नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची भूमिका असते, कोणी अधिक चांगले काम करेल तर कोणी कमी, परंतु इराणची मूळ राजकीय चौकट ही ठोस सिद्धांतांवर आणि भक्कम संस्थात्मक संरचनेवर उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र
28 फेब्रुवारी 2026 रोजी खामेनी यांची हत्या झाल्यानंतर लारीजानी हे इराणचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. इस्रायलच्या दाव्यानुसार, लारीजानी हे इराणच्या सुरक्षा धोरणांचे मुख्य शिल्पकार होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. सर्वोच्च नेते आणि त्यानंतर लारीजानी अशा दोन मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूनंतरही इराणचे परराष्ट्र मंत्री देशाच्या स्थिरतेचा संदेश देत आहेत. सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. अशा कठीण काळात अराघची यांनी दिलेली ही प्रतिक्रिया म्हणजे जगाला आणि शत्रू राष्ट्रांना दिलेला एक स्पष्ट इशारा आहे.
युद्धाच्या ज्वाळा जगभर, 300 सैनिकांसह इराणचे सुरक्षाप्रमुख लारीजानी इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले


























































