
अशोक खरातचं प्रकरण हे एपस्टीन फाईल्सपेक्षा भयंकर आहे. मुख्यमंत्री कान, तोंड, डोळे बंद करून बसले आहेत. या भोंदूबाबाकडे कोण जात होतं, अघोरी कृत्य कोण करत होतं, ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून जाणून घ्यावं, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला आहे. मग असे असतानासुद्धा शासनातील मोठ्या पदावरील बसलेल्या व्यक्ती मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा असू देत किंवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाची पूजा करत आहेत. कोणी जादूटोण्याला बसले आहे, त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्रे आली आहेत, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
मंत्र्यांना बडतर्फ करावे
महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवणे, अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे. मंत्री, नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात? ज्यांचे संबंध तिथे उघड होत आहेत त्यांना पदावरून दूर केले पाहिजे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृह मंत्रालयाने यांना बडतर्फ करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले





























































