
परवानगीशिवाय म्हाडाचे नाव आणि लोगो वापरून गिरणी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या चढ्ढा बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले आहेत.
शेलू आणि वांगणी येथे 81 हजार घरे खासगी बिल्डरच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. मात्र चढ्ढा बिल्डर गिरणी कामगारांशी परस्पर संपर्क साधून म्हाडाचे नाव आणि लोगोचा वापर वापरून त्यांची दिशाभूल करून पैसे उकळत असल्याच्या आणि जबरदस्ती संमतीपत्रे भरून घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात आमदार प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दहा अटी आणि शर्थीच्या अधीन राहून केवळ शेलू आणि वांगणीतील दोनच प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी चड्ढा बिल्डरला म्हाडाचे नाव आणि लोगो वापरण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु चड्ढा बिल्डरने इतर प्रकल्पासाठी देखील याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. तसेच यापुढे या दोन प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी म्हाडाचे नाव व लोगो वापरता येणार नाही, अशा कडक शब्दात चड्ढा बिल्डरला समज देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
परंतु चड्ढा बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार अॅड. अनिल परब, प्रवीण दरेकर, भाई जगताप, प्रसाद लाड यांनी सभागृहात लावून धरली. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंत्र्यांकडून देण्यात आले.





























































