विद्यार्थ्यांना मजुरीच्या कामाला जुंपले; खोपोलीच्या सह्याद्री शाळेतील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका शाळेतील बेंच व टेबल दुसऱ्या शाळेत नेण्यासाठी विद्यार्थ्यांना मजुरीच्या कामाला जुंपून त्यांना टेम्पोतून असुरक्षित प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना खोपोलीत घडली आहे. नववी व दहावीमध्ये शिकणारी ही मुले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित शिक्षक व संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

खोपोलीच्या जनता विद्यालयातील बेंच व टेबल शिळफाटा येथील सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी टेम्पोने न्यायचे होते. या वाहतुकीसाठी मजूर आणणे आवश्यक होते. पण शिक्षकांनी सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावले व त्यांनाच टेम्पोमध्ये बेंच आणि टेबल लोड करण्यास सांगितले. सह्याद्री विद्यालयापर्यंत मुले टेम्पोला अक्षरशः लटकत प्रवास करत होती. विद्यार्थ्यांनीच हे साहित्य टेम्पोतून खाली उतरवले.

एकजण बालबाल बचावला

मुले लटकत टेम्पोतून जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अश्फाक लोगडे यांना दिसताच त्यांनी काही मुलांना समजदेखील दिली. शिळफाटा येथील दर्गाजवळून टेम्पो जात असताना एक विद्यार्थी खाली पडताना बालबाल बचावला. दक्ष सामाजिक कार्यकर्ते अभिजित घरत यांनी तर काही काळ त्या टेम्पोचा पाठलागही केला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागे शिक्षकांची गाडी असल्याचे दिसून आले. दरम्यान बेंच व टेबलच्या वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांना जुंपल्याचे समजताच अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत खाडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही