IPL 2026 – राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरला BCCI ची नोटीस; वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसून केलं असं काही की…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेल्या आठवड्यात गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला होता. या लढतीत बंगळुरूने राजस्थानला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 12 चेंडू आणि 6 विकेट्स राखून पार केले. या लढतीदरम्यान राजस्थानचे मॅनेजर रोमी भिंदर यांनी डगआऊडमध्ये बसून केलेल्या एका कृतीमुळे बीसीसीआयने त्यांना नोटीस धाडली आहे.

आयपीएलमधील शिस्त आणि नियमांच्या बाबतीत बीसीसीआयने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंदर यांनी डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचे समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राजस्थान विरुद्ध बंगळुरू या सामन्यादरम्यान रोमी भिंदर डगआऊटमध्ये बसून मोबाईल वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले.

आयपीएलच्या ‘प्लेअर्स अँड मॅच ऑफिशिअल्स एरिया’ प्रोटोकॉलनुसार डगआऊटमध्ये केवळ टीम ॲनालिस्टलाच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची परवानगी असते. मॅनेजरला फोन वापरण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे बीसीसीआयने भिंदर यांना नोटीस पाठवून 48 तासांमध्ये खुलासा करण्यास सांगितले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयच्या अँटी-करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने भिंदर यांना 48 तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही ACSU ला या घटनेचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे धुमल यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय आणीबाणी की…

भिंदर यांनी हा फोन वैद्यकीय आणीबाणी किंवा प्रकृतीच्या कारणास्तव सोबत ठेवला होता. रोमी भिंदर यांना फुफ्फुसाचा गंभीर आजार होता. या आजारामध्ये त्यांना नागपूरमध्ये दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागले होते. आजारपणामुळे त्यांचे वजन किलोहून अधिक कमी झाले असून त्यांना दम्याचा देखील त्रास आहे. डॉक्टरांनी त्यांना जास्त चालणे किंवा पायऱ्या चढणे टाळण्यास सांगितले आहे. डगआऊटमधून ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी सुमारे 50 पावले चालून 20 पायऱ्या चढाव्या लागतात. हे त्यांच्या प्रकृतीसाठी कठीण होते.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भिंदर फोन वापरत असताना त्यांच्या शेजारी बसलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी देखील फोनमध्ये डोकावताना दिसत आहे. यामुळेच या प्रकरणाकडे भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिक लक्ष वेधले गेले.