
आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा पाय तोडला. यानंतर पत्नीचा तोडलेला पाय घेऊन पती पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
पालनाडू जिल्ह्यातील मुप्पल्ला मंडळांतर्गत येणाऱ्या थोंडापी गावात गुरुवारी ही घटना घडली. भुलक्ष्मी असे पीडित पत्नीचे तर लक्ष्म्मय्या असे आरोपी पतीचे नाव आहे. लक्ष्म्मय्याला भुलक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय होता. यातून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. गुरुवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले आणि लक्ष्म्मय्याने कुऱ्हाडीने भुलक्ष्मीवर हल्ला केला.
या हल्ल्यादरम्यान भुलक्ष्मी गंभीर जखमी झाली. तिचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आणि तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. यानंतर, आरोपी पतीने पत्नीचा तोडलेला पाय पिशवीत घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भुलक्ष्मीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. भुलक्ष्मीच्या शरीरातून अतिरक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.

























































