IPL 2026 – दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७५ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, ट्रिस्टन स्टब्ज व डेव्हिड मिलर यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करीत दिल्ली कॅपिटल्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना मिलरने दोन षटकार व एक चौकार ठोकून एक चेंडू शिल्लक असतानाच सामना संपविला. ६० धावांची खेळी करणारा स्टब्ज या सामन्याचा मानकरी ठरला.

भुवनेश्वरने कापली आघाडीची फळी

बंगळुरूकडून मिळालेले १७६ धावांचे लक्ष्य दिल्लीने १९.५ घटकांत ४ बाद १७९ घावा करीत पूर्ण केले. खरं तर लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचीही सुरुवात निराशाजनकच झाली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पथुम निस्संका (१), करुण नायर (५) व समीर रिझवी (२) ही आघाडीची फळी कापून काढत दिल्लीची २.५ षटकांत ३ बाद १८ अशी दुर्दशा केली. त्याने निस्संकास पायचित पकडले, तर नायरला सॉल्टकरवी झेलबाद केले. मग रिझवीला यष्टीमागे जितेश शर्माकरवी झेलबाद केले.

राहुल, स्टब्ज यांची अर्धशतके

दिल्लीचा डाव संकटात असताना लोकेश राहुल (५७) व ट्रिस्टन स्टब्ज (नाबाद ६०) यांनी दणकेबाज अर्धशतके ठोकून दिल्लीला संकटातून बाहेर काढले. राहुलने ३४ चेंडूंत ६ चौकारांसह २ षटकार ठोकले. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर कोहलीने सीमारेषेजवळ जबरदस्त सूर मारून राहुलचा अफलातून झेल टिपला. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने १९ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावा केल्या. तो रिटायर्ड हर्ट झाल्याने दिल्लीचा डाव पुन्हा संकटात सापडला. मात्र, स्टब्जने आलेल्या डेव्हिड मिलरच्या साथीत २४ चेंडूंत नाबाद ५४ धावांची भागीदारी करीत बंगळुरूकडे झुकलेला सामना खेचून आणला. मिलरने रोमारिओ शेफर्डच्या अखेरच्या षटकात षटकार, षटकार व चौकार ठोकून एक चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ फलंदाज बाद केले, तर कृणाल पंड्याला एक बळी मिळाला.

फिल सॉल्टची एकाकी झुंज

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ बाद १७५ अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. सलामीवीर फिल सॉल्टने एकाकी झुंज देताना ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांनी निराशा केल्याने बंगळुरूला समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. विराट कोहलीने १३ चेंडूंत ३ चौकारांसह १९ धावांची खेळी केली. एनगिडीला पुढे सरसावून फटकाविण्याच्या नादात तो चकला व निस्संकाने अचूक झेल टिपला. त्याच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कल यालाही छाप सोडता आली नाही. त्याने १३ चेंडूंत एक चौकार व एका षटकारासह १८ धावा केल्या. अक्षर पटेलने त्याला मिलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर मुकेश कुमारने फॉर्मात असलेला कर्णधार रजत पाटीदार (८) याला यष्टीमागे राहुलकरवी झेलबाद करून दिल्लीला बहुमोल बळी मिळवून दिला.

मधल्या फळीचाही फ्लॉप शो

फिल सॉल्ट वगळता आघाडीच्या फळीने निराशा केल्यानंतर मधल्या फळीवर मोठी जबाबदारी होती. मात्र, टीम डेव्हिड (२६) व जितेश शर्मा (१४) हे फलंदाज अपयशी ठरले अन् येथेच बंगळुरूच्या धावगतीला चाप लागला. त्यातच रोमारियो शेफर्ड (१) व कृणाल पंड्या (१२) बाद झाल्याने बंगळुरूला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. दिल्लीकडून लुंगी एनगिडी, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले, तर मुकेश कुमारला एक बळी मिळाला.