
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावरून बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी भाजप महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्षात मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रविवारी पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना या विधेयकाचा गाभा समजलेलाच नाही. महिलांच्या नावाखाली हे लोक मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत होते.”
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले, “ते मुख्यमंत्री झाले आहेत, पण निर्णय काय घेणार? गुजरातमधील नेते जे सांगतील तेच ते करतील. त्यांना चालवण्यासाठी थेट दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून लोक येत आहेत” असेही तेजस्वी यादव म्हणाले.


























































