महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते! – प्रणिती शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतेो, पण त्यांचा कुटील डाव विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे. कधी व कुठे यायचे ते सांगा आणि नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीने पास झालेले आहे. पण भाजप सरकारने त्यात जनगणना व मतदार संघ पुनर्रचनेच्या दोन अटी टाकल्या होत्या. या अटी न ठेवता सध्या लोकसभेच्या असलेल्या 543 जागांमधूनच 33 टक्के आरक्षण द्यावे, या मागणीकडे भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. 16 एप्रिल 2026 ला विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक आणण्याचा भाजपचा प्रयत्न हा खोटा होता. त्यांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करून घ्यायचे होते.

दक्षिणेतील राज्य व उत्तरेतील राज्ये यांच्यात उभी फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचा डाव भाजपचा होता. हा डाव उधळून लावल्यानंतर ‘इंडिया आघाडी’ महिला विरोधी आहे हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पश्चिम बंगाल व तामिळनाडू मध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपाने हा डाव टाकला होता पण तो त्यांच्यावरच उलटला आहे, असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी लगावला.

“मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? हे विधेयक 2023 ला एकमताने मंजूर झाले, मग…”, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेडाळूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपच्या काळातच झाले आहे. ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महिलांची फक्त भ्रूणहत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना किती स्थान व सन्मान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपच्या इतिहासात एकही महिला अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.