IPL 2026: पंजाबच्या धावांच्या डोंगरामागे होतं ‘हे’ खास कारण; कॅप्टन श्रेयसने केला खुलासा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट टेबल्समध्ये आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. या दमदार विजयानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या तुफानी फलंदाजीमागचे गुपित उघड केले. ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंमध्ये रंगलेल्या षटकारांच्या स्पर्धेमुळेच मैदानात फलंदाजीची अशी आतषबाजी पाहायला मिळाली, असे अय्यरने स्पष्ट केले.

या सामन्यात प्रियांश आर्या आणि कूपर कॉनोली यांनी लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. प्रियांशने 93 धावांची तर कॉनोलीने 87 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या दोघांच्या अप्रतिम भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्सने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 254 धावांचा डोंगर उभा केला, जी या चालू आयपीएल हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजांचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला की, खेळाडूंनी केलेली भागीदारी थक्क करणारी होती. विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध बॅक-फूटवर जाऊन मारलेले सरळ फटके लक्षणीय होते. केवळ आक्रमकताच नव्हे, तर मधल्या षटकांमध्ये फलंदाजांनी दाखवलेला संयम आणि खेळावरील नियंत्रण खरोखरच पाहण्यासारखे होते, अशा शब्दांत त्याने आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.