
कीटकनाशक औषधे आणि कृषी बियाणे विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत जास्त दराने किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री करू नये. रासायनिक खत विक्रेत्यांनी कोणत्याही खतांची साठवणूक, काळाबाजार व जादा दराने विक्री करू नये. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिला आहे.
कृषी हंगामादरम्यान कोणतीही टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करावा.जिल्ह्यातील खतांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक प्रमाणात खते उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये युरिया, डीएपी, एनपीके, एसएसपी व संयुक्त खतांचा समावेश असून, मागील वर्षांच्या सरासरी वापराचा विचार करून यंदा साठा उपलब्ध करण्यात येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत पुरेसा साठा राखून ठेवण्यात येणार असून, जिल्ह्यातील 23 ठिकाणी खतांचा ‘बफर स्टॉक’ उपलब्ध राहील. यामध्ये 650 मे.टन युरिया आणि 5 मे.टन डीएपी खताचा समावेश आहे.यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळण्यास मदत होणार आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले. माती परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्र.8830264335 सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी कृषी बियाणे,खते आणि किटकनाशक औषधे याबाबत तक्रार द्यायची असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.





























































