राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; तुषार दोषींसह वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह एकूण नऊ जिल्ह्यांमधील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्हा स्तरावरील प्रशासकीय रचनेत महत्त्वाचे बदल होणार असून, पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बदल्यांनुसार, तुषार दोशी यांची सातारा येथून सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी, तर निखिल पिंगळे यांची पुण्याहून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूरच्या अधीक्षकपदी बदली झाली असून, एम. रमेश यांची गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. धुळ्याचे श्रीकांत धिवरे आता जळगावचे नवे पोलीस अधीक्षक असतील, तर तेथून महेश्वर रेड्डी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच संदीप घुगे यांची सांगलीवरून मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागात, योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षकपदी आणि राजकुमार शिंदे यांची वाशीमच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.