Kolhapur News – जिल्हाधिकारी कार्यालयातील कोट्यवधी खर्चून बांधलेल्या सभागृहाला गळती! पालकमंत्र्यांच्या बैठकीतच निकृष्ट कामाचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हाधिकारी कार्यालयावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून साकारलेले आलिशान सभागृह अवघ्या सात-आठ महिन्यांतच निकृष्ट कामामुळे चर्चेत आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामाचे जाहीर वाभाडे निघाले. बैठकीदरम्यान चक्क छताला असलेल्या एसीमधून पाण्याच्या धारा बरसू लागल्या आणि माईक यंत्रणाही पूर्णपणे कोलमडली. आधुनिक आणि देखणे म्हणवल्या जाणाऱ्या या सभागृहाची ही दुरवस्था पाहून उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनीही कपाळाला हात लावून घेतला.

जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कडाक्याच्या उन्हामुळे उपस्थितांना दिलासा मिळण्याऐवजी सभागृहातील एसी बंद पडल्याने सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यातच एका एसीमधून चक्क पाणी गळती सुरू झाल्याने सभागृहात जलबिचल निर्माण झाली.

कौतुकास्पद बाब म्हणजे, केवळ सात ते आठ महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरण आणि या नवीन सभागृहाचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतच छताची गळती आणि यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने या कामाच्या दर्जाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बैठकीत ध्वनी यंत्रणाही नीट चालत नसल्याने व्यासपीठावरून मंत्री आणि आमदार काय बोलत आहेत, हे शेवटपर्यंत कोणालाच नीट ऐकू येत नव्हते. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सर्वजण घामाघूम झाले होते.

जिल्ह्यातील विविध विकासकामांमध्ये होणाऱ्या कथित ‘टक्केवारी’च्या भ्रष्टाचारावरून नेहमीच ओरड होत असते. मात्र, आता खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातच केलेल्या कामाचा हा असा दर्जा पालकमंत्र्यांच्या डोळ्यादेखत उघडा पडल्याने प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे. या निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची आणि संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.