
छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात सोमवारी एका खासगी विमानाला भीषण अपघात झाला. जशपूरच्या आरा टेकड्यांमध्ये हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे चार्टर्ड विमान नारायणपूर क्षेत्रातील रतनपहली जंगलात झाडांवर आदळले आणि दुर्घटनाग्रस्त झाले. स्थानिकांनी सांगितले की, अपघातानंतर डोंगराळ भागातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले. हे विमान जमिनीपासून साधारण ३० फूट उंचीवर उडत असताना हा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
विमानामध्ये नेमके किती लोक सवार होते, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. हा भाग डोंगराळ असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. या अपघातात झालेल्या जीवितहानीबाबतही प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून, चौकशीनंतरच नेमकी माहिती दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


























































