
>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]
महाकवी कालिदासाच्या रचना सौंदर्य, उपमा आणि भावनाप्रधानतेसाठी अत्युच्च मानल्या जातात. निसर्गाचे अनुपमेय वर्णन करणारे कालिदासाचे निसर्गकाव्य आजही तितकेच दृश्यमान भासते. ऋतुचक्रातील सहाही ऋतूंचे सोहळे साजरा करणाऱया ऋतुसंहार या काव्याचे हे रसग्रहण.
संस्कृत काव्याचा परिचय करून घेणाऱया या लेखमालेत पाच महाकाव्यांचा परिचय करून घेतल्यानंतर आता ‘ऋतुसंहार’ या कालिदासाच्या लघुकाव्याकडे किंवा खंडकाव्याकडे वळू या.
ही कालिदासाची पहिली साहित्यकृती असावी असे मानले जाते. आजूबाजूच्या निसर्गाचे वर्णन करणारे हे काव्य आहे. याला कुणीएक नायक किंवा नायिका नाही. एखादा फोटोग्राफर खांद्यावर कॅमेरा घेऊन फिरतो आहे आणि त्याला दिसणारी निसर्गाची, माणसांची चित्रे कॅमेराबद्ध करतो आहे असे वाटावे अशी सुंदर दृश्ये कालिदासाने इथे शब्दांत टिपली आहेत.
ऋतुचक्रातील सहाही ऋतूंचे वर्णन त्याने सारख्याच आत्मीयतेने केले आहे हे विशेष. आता वर्षा ऋतू हा कवींचा आवडता ऋतू आहेच, पण सगळ्यांना त्रस्त करणारा, असह्य वाटणारा उन्हाळा! त्याचे काय वर्णन करायचे! असे वाटू शकते, पण कालिदासाने ग्रीष्म ऋतूपासूनच या काव्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात विक्रमी तापमानाच्या बातम्या आपण नुसत्या वाचत नाही आहोत, अनुभवतो आहोत. अशा वेळी कालिदासाच्या या वर्णनातून तरी थोडा गारवा अनुभवायला मिळतो का ते पाहू या !
या नीरस ऋतूचे वर्णनदेखील कालिदास इतक्या सहृदयतेने करतो की, दाद दिल्याशिवाय राहवत नाही. आज आपल्याकडे एसीपासून सगळ्या सुविधा आहेत. तरीही आपण उन्हाळ्याने त्रस्त होतो, पण कालिदासाच्या काळात निसर्गाशी मैत्री असल्यामुळे त्या काळातील समाज ऋतूंशी किती सहजतेने जुळवून घेत होता याही दृष्टीने हे काव्य पाहणे फार रंजक ठरते.
आता हा पहिलाच श्लोक पहा. या काव्याचा आणखी एक विशेष म्हणजे भाषा अतिशय सुबोध आणि प्रासादिक आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईलच.
प्रचण्डसूर्यः स्पृहणीयचन्द्रमाः
सदावगाहक्षतवारिसञ्चय ।
दिनान्तरम्यो भ्युपशान्तमन्मथो
निदाघकाल समुपागत निदाघकालो।
यमुपागत प्रिये । 1।
प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो आहे, “पहा पहा, निदाघ काल म्हणजेच ग्रीष्म ऋतू आला बरे ! कसा आहे हा ऋतू, तर सूर्याचे तेज प्रखर आहे. त्यामुळे रात्री येणारा शीतल चंद्र अधिकच हवाहवासा वाटू लागतो. कितीही वेळ पाण्यात डुंबलो तरी समाधान होत नाही. संध्याकाळ ही दिवसाची सगळ्यात सुंदर वेळ असते. उष्णतेमुळे कामदेवाचाही प्रभाव जणू शांत झाल्यासारखा भासतो. असा हा ग्रीष्म ऋतू.
पुढच्या श्लोकाकडे वळत असताना आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे अप्रूप वाटत राहते. तुम्हाला आठवते का, बालपणी सुट्टीत मामाच्या गावी गेल्यावर बाहेर रणरणतं ऊन असताना घरात किती थंडगार वाटत असे. नैसर्गिकरीत्या गारवा निर्माण करण्याच्या अनेक सोयी आपल्या संस्कृतीत किती सहजपणे सामावल्या गेल्या आहेत! माठाचे पाणी असेल, वाळ्याचे पडदे असतील, या दिवसांत रात्री चंद्रप्रकाशाने न्हालेल्या असतात. निळसर आकाशात पसरलेली चांदणी आणि थंडावा देणारी विविध जलयंत्रे (फवारे, पाण्याचे खेळ) यामुळे काही ठिकाणे विशेष रमणीय दिसतात. मण्यांनी सजवलेले प्रासाद, सुगंधी चंदन आणि शीतल वातावरण या सर्व गोष्टी लोकांना या ऋतूत विशेष प्रिय वाटू लागतात. संध्याकाळी गच्चीचं आकर्षण तेव्हाही होतंच. या ऋतूत विशेष आकर्षण सुगंधाचे. संध्याकाळी वाऱयाच्या मंद झुळुका आणि संगीताची मैफल, खाण्यापिण्याची चंगळ असे विलासी आयुष्य या काव्यात सहज येते. कालिदासाचा काळ हा अतिशय वैभवाचा काळ मानला जातो. त्यामुळे इथला प्रत्येक जण सुखी, समाधानी आहे.
संध्याकाळी प्रिया भेटली की काय होतं? प्रियेचा शृंगारही या काळात ऋतू अनुकूल असतो. वजनाने जड, गरम वाटणारे कपडे कितीही उंची असले तरी तिला नकोसे वाटतात. तिला आता तलम सुती, रेशमी वस्त्र अधिक आवडतात. मोत्याचे दागिने खुलून दिसतात. चंदनाची उटी धारण करून ती शीतलता निर्माण करते.
आता तिच्या पायांवर लावलेल्या लाल अळत्याचा रंग नूपुरांच्या मंजुळ नादासह चालताना प्रत्येक पावलावर जणू हंसाच्या कूजनाची आठवण करून देतो. या लयबद्ध, मोहक हालचालींमुळे लोकांच्या मनात पुन्हा प्रेमभावना जागृत होतात आणि त्यांच्या चित्तावर कामदेवाचा प्रभाव उमटतो.
सुगंधी उटण्याचे स्नान करून तिने केस मोकळे सोडले आहेत. केसांनाही सुगंधी द्रव्य लावले आहे. त्यामुळे तिच्या भोवती सुवासिक वलय तयार झाले आहे. अशा प्रियेच्या सहवासात दिवसभराचा थकवा दूर झाला नाही तरच नवल नाही का? या सुंदरी आता रात्री गारव्यासाठी गच्चीत झोपतात. रात्रभर चंद्र त्यांचे सुंदर चेहरे पाहत राहतो. सकाळी बिचाऱयाचा चेहरा इतका उतरतो. दमलेला, पांढुरक्या चेहऱयाचा चंद्र पहाटे मान खाली घालून गुपचूप निघून जातो.
हवेत वाऱयाच्या गरम झळा आहेत. त्यामुळे वारा सुटला तरी गारवा नाही. उलट प्रवासात धुळीचे लोट उठत आहेत की, समोरचा रस्ताही दिसू नये. कधी एकदा घर गाठतो अशी प्रेमी जनांना आस लागली आहे.
ही नगरातली अवस्था म्हणा, पण मग रानावनात पशुपक्ष्यांची काय बरं अवस्था झाली असेल याचेही फार सुंदर वर्णन कालिदास त्याच्या खास शैलीत करतो. ही जंगल सफर आपणही करू या, पण पुढील लेखात.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)






























































