
महायुती सरकारने मंजुरी दिलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही योजना फसवी असून, त्यातील जाचक अटींमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, असा आरोप त्यांनी केला.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. खासदार ते नगरसेवक, सरकारी कर्मचारी, अधिकारी, २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या सरकारी किंवा अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे. अशा जाचक अटी-शर्तींचा विरोध पक्षांकडून निषेध करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या ‘महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान’ या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांचे थकीत असलेले कर्ज आता पूर्णपणे माफ होणार नाही, त्यांना फक्त ५० हजार रुपयांचाच फायदा मिळणार आहे.
ही योजना फक्त पीककर्ज व पुनर्गठित कर्ज या कर्जांसाठी जाहीर केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहीर, पाइपलाइन व गायी-म्हशींसाठी कर्ज घेतलेले आहे, तेसुद्धा थकीत आहे. असे सर्व शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
पगार असलेल्या सरकारी किंवा अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे. अशा जाचक अटीशर्तींचा विरोधी पक्षांकडून निषेध होत आहे. शेतकरी संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
…या मुद्द्यांवर आक्षेप
■ ही कर्जमाफी १ एप्रिल २०१९ ते दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वाटप केलेल्या व हे कर्ज थकीत झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
■ अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्ज घेतलेले असून ते कर्ज थकीत झाल्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकत नाही.
■ एका अंदाजानुसार ही संख्या जाहीर झालेल्या कर्जमाफीमधून लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुपटीपेक्षा जास्त आहे.
मोदी-फडणवीसांच्या घोषणा फसव्या – संजय राऊत
शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी या कर्जमाफी योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही घोषणा म्हणजे फसवणुकीचा प्रकार आहे, प्रत्येक योजनेमध्ये ते लोकांना फसवत आहेत, अशी टीका केली. शेतकऱ्यांनी कडवट भूमिका घेऊन भाजपला मदत करू नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा – सपकाळ
कर्जमाफी योजनेचे नियम आणि अटीशर्ती पाहिल्या तर अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली गेली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बऱ्याचे पैसे शेतकरी कसे भरणार? – वडेट्टीवार
सरकार या योजनेतून शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. पण त्याच्यावरील रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे आहेत का याचा विचार सरकारने केला आहे का, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप हंगामापूर्वी पैसे पडले पाहिजेत. कारण थकबाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळत नसल्याने खरीपासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले.

























































