साय-फाय – विचार ‘हॅक’ झाले तर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर
[email protected]

विज्ञानाने आजवर अनेक चमत्कार केले आहेत, पण आता विज्ञान थेट माणसाच्या त्या भागावर ताबा मिळवू पाहत आहे, जिथे त्याचे अस्तित्व सामावलेले आहे तो म्हणजे ‘मानवी मेंदू’. इलॉन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीने मानवी मेंदूत ‘चिप’ बसवण्याचा दुसरा यशस्वी प्रयोग पार पाडला असून तंत्रज्ञान विश्वात एका नव्या वादाला आणि कुतूहलाला तोंड फुटले आहे. ज्या गोष्टी आपण आजवर सायन्स फिक्शन चित्रपटात पाहत होतो, त्या आता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत.

न्यूरालिंकने विकसित केलेली ही चिप एका नाण्यासारखी असून ती शस्त्रक्रियेद्वारे मेंदूच्या त्या भागात बसवली जाते, जो हालचालींवर नियंत्रण ठेवतो. या चिपमध्ये हजारो सूक्ष्म इलेक्ट्रोड्स आहेत जे मेंदूतील लहरींचे (Brain Signals) वाचन करतात. नुकत्याच झालेल्या प्रयोगात ज्या व्यक्तीला अर्धांगवायू झाला होता, ती केवळ ‘विचाराने’ कॉम्प्युटरवर गेम खेळली आणि माऊस कर्सर हलवला. म्हणजे हात न उचलता किंवा एक शब्दही न बोलता मेंदूतील विचार थेट डिजिटल कमांडमध्ये रूपांतरित झाले. शारीरिक मर्यादा असलेल्या व्यक्तींसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार यात शंकाच नाही.

पण एक जाणकार म्हणून जेव्हा संशोधक याकडे पाहतात तेव्हा धोक्याची घंटा स्पष्ट ऐकू येते. आजवर आपला मोबाईल, बँक खाते किंवा ई-मेल हॅक झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत, पण विचार करा, जर तुमच्या मेंदूतली चिप हॅक झाली तर? तंत्रज्ञानाचा वापर करून कोणी तुमचे विचार वाचू शकले किंवा तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवले तर मानवी स्वातंत्र्याचं काय? आज आपण ‘डेटा प्रायव्हसी’बद्दल बोलतो, पण भविष्यात ‘थॉट प्रायव्हसी’ (विचारांची गोपनीयता) नावाचा प्रकार शिल्लक राहील का? हा मोठा यक्षप्रश्न आहे. आपण माणसाला सुपरह्युमन बनवण्याच्या नादात त्याला मशीन तर बनवत नाहीये ना? काही वर्षांपूर्वी साधे कॉम्प्युटर्ससुद्धा आश्चर्य वाटायचे, पण आज मेंदूत चिप बसवून माणसाला कॉम्प्युटरशी जोडणं म्हणजे निसर्गात केलेली मोठी ढवळाढवळ आहे. ईश्वराने दिलेली बुद्धी आणि यंत्राची गती यांचा हा मिलाफ नेमका कुठे जाऊन थांबणार?

केवळ मस्कच नाही, तर चीन आणि इतर अनेक देश आता या शर्यतीत उतरले आहेत. या चिपचा वापर केवळ आजार बरे करण्यासाठीच होईल की, भविष्यात श्रीमंत लोक आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी याचा वापर करतील? जर असे झाले तर समाजात एक नवी दरी निर्माण होईल. एकीकडे स्मार्ट चिप बसवलेले लोक आणि दुसरीकडे सामान्य माणसं, हा सामाजिक समतोल कसा राखला जाणार, यावर आताच जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याची गरज आहे, असे काही संशोधक सांगत आहेत.

मेंदूत चिप बसवणे हा विज्ञानाचा एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो अर्धांगवायू किंवा मेंदूच्या आजाराने ग्रासलेल्या लोकांसाठी नवी उमेद घेऊन आला आहे. मात्र, हे तंत्रज्ञान वापरताना आपण मानवी संवेदना आणि नैतिकतेचा बळी देता कामा नये. यंत्रांना मेंदूत जागा देताना माणसाचे माणूसपण हरवू नये हीच मोठी कसरत असणार आहे. शेवटी तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी असावे, त्याच्या अस्तित्वाच्या मुळावर उठण्यासाठी नाही.

आपण सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवर नाचतो, पण जेव्हा एखादी कंपनी थेट आपल्या मेंदूतील लहरींशी जोडली जाईल, तेव्हा आपल्याला पडणारे विचार हे स्वतंत्र असतील की एखाद्या जाहिरातीने प्रेरित केलेले, ही भीती केवळ काल्पनिक नाही. जर तंत्रज्ञान कंपन्यांनी मेंदूतील डोपामाईन (आनंद देणारे रसायन) स्रवण्यावर नियंत्रण मिळवले तर माणूस हा यंत्रांचा गुलाम व्हायला वेळ लागणार नाही. सत्ता आणि पैसा यांसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा वेळी मेंदूची चावी दुसऱयाच्या हातात देणे किती सुरक्षित आहे?