

कारगील हा कश्मीरचा भाग या भ्रमात भारतीय जनता आहे. कारगील हा लडाखचा भाग आहे. 1999 सालचे कारगील युद्ध लडाखच्या भूमीवर झाले. त्यातील हुतात्म्यांचे ‘युद्ध स्मारक’ कारगिलात उभे आहे. लडाख, कश्मीर आज वेगळे झाले, पण प्रश्न तेच आहेत. कश्मीर प्रदेश ही पार्वतीची भूमी. या भूमीत चीड, संताप यांवर बंदी आहे!
श्रीनगर ते कारगील प्रवासात भारतीय संस्कृती आणि हिमालयाचे विहंगम चित्र अनुभवता आले. भारतावर प्रेम असलेल्या प्रत्येकाने हा प्रवास एकदा करायला हवा. या प्रवासात सामान्य ‘कश्मिरी’ राजकीय कार्यकर्ते आणि सैन्य अधिकारी भेटले. श्री. संजय नहार अनेक वर्षे कश्मीर खोऱ्यात सामाजिक काम करतात. दुर्गम भागात शाळा चालवतात. ते म्हणाले, “कश्मीर साधे नाही. कश्मीर हे देवी पार्वतीचे रूप आहे. देवी सरस्वतीला कश्मीरात ‘कश्मीर पूरवासिनी’ म्हटले आहे. पार्वती संतापी होती. त्यामुळे कश्मिरी मातीत सतत ‘बंड’ आहे.
हे बंड, अस्वस्थता चिरडणे व बंदुकीच्या जोरावर राज्य टिकवणे योग्य नाही. खोऱ्यातील तरुणांशी संवाद आज तुटला आहे व 370 कलम काढल्याने हिंदुत्वाचा विजय झाला असे मानणे चूक आहे.” ”आमची फसवणूक झाली. एकही आश्वासन पाळले गेले नाही”, असे सांगणारे लोक श्रीनगरपासून लडाख, कारगीलपर्यंत भेटले. जम्मू-कश्मीर विद्यार्थी संघटनेचे तरुण पदाधिकारी भेटले. ते म्हणतात, “दिल्लीला कश्मीर फक्त भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आजच्या नेत्यांनी कश्मीरचा इतिहास पुन्हा वाचायला हवा. कश्मीरला पार्वतीचे रूप मानता आणि कश्मिरी मुलांच्या भावना मारता, हा पार्वतीवर अन्याय आहे!”
“जम्मू-कश्मीरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आम्ही निराशेच्या गर्तेत आहोत. आमच्याबाबत भेदभाव केला जातोय. देशभरातील शिकणाऱ्या कश्मिरी विद्यार्थ्यांना सामाजिक बहिष्कार, छळाला सामोरे जावे लागते. येथील तरुणांचा आत्मविश्वास ढासळलाय. आम्ही देशाचे नागरिक आहोत हे सरकारला मान्य नाही काय?” हा त्यांचा प्रश्न बिनतोड आहे. राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांत सहभागी होण्याची संधी कश्मीरातील तरुणांना मिळत नाही. भूतकाळातील संघर्ष, इंटरनेटवर बंदी, शिक्षण-संशोधनातील व्यत्यय यामुळे असंख्य उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभागी होता येत नाही. केंद्रीय स्पर्धा परीक्षा (UPSC) रेल्वे, बँकांच्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळायला हवी ही विद्यार्थ्यांची मागणी वैध आहे, पण सरकार इन्फ्रास्ट्रक्चर व धार्मिक कामांत जास्त गुंतले आहे आणि पार्वतीच्या प्रदेशातील जनतेच्या भावनांकडे सरकारचे लक्ष नाही.
कारगीलचा लढा
सोनमर्ग, गुलमर्ग, द्रास येथील बर्फात पर्यटकांची गर्दी आहे. कारगील हा पूर्णपणे लडाखचा भाग. अनेकांना वाटते कारगील हा जम्मू-कश्मीरात येतो. तसे नाही. भारतीय सीमेवर कारगील आहे. 1999 साली येथे पाकिस्तानी घुसले. पहाडावरून त्यांनी हल्ले केले. या अनपेक्षित हल्ल्याने गोंधळ उडाला. ते उंचावरून हल्ले करत असल्याचा फायदा झाला. त्यांनी ‘हायवे’ ताब्यात घेतला, पण भारतीय सैन्याने 562 सैनिकांचे बलिदान देऊन पाकिस्तानला पळवून लावले. त्या 562 वीरांचे ‘कारगील युद्ध स्मारक’ आता उभे आहे. भारतीय भूमीवर हे युद्ध झाले. त्यात अनेक तरुण योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिली. स्मारकाच्या जागेवरून वर ‘टायगर हिल्स’ दिसते. कॅ. विक्रम बात्रा त्यांच्या सैन्य तुकडीसह तेथे पोहोचले व ‘टायगर हिल्स’ पाकिस्तानी सैन्यापासून मुक्त केले. त्या लढाईत कॅ. बात्रा यांना हौतात्म्य पत्करावे लागले. अशा सर्व वीरांच्या प्रतिमा तेथे शौर्यगाथांसह उभ्या आहेत. लढणाऱ्यांना प्रेरणा देणारे आणि देशभक्ती म्हणजे काय हे दाखवणारे ’कारगील युद्ध स्मारक’ नव्या पिढीने पाहायला हवे. देशभक्ती म्हणजे फक्त हिंदू विरुद्ध मुसलमानांचा संघर्ष नाही. कपाळावर टिळा लावून हैदोस घालणे नाही. लोकशाहीचे युद्ध वाममार्गाने जिंकणे नाही. युद्धाचा पाया बलिदान व त्याग आहे. तीच खरी देशभक्ती हे कश्मीरातून कारगीलपर्यंतच्या प्रवासात दिसते व युद्ध स्मारकात प्रवेश केल्यावर जवानांच्या बलिदानाच्या गाथा वाचून डोके सुन्न होते. देशभक्तीचा सुगंध प्रत्येक हिमनगातून जणू आपल्यापर्यंत पोहोचतो. मराठा रेजिमेंटवर कारगील स्मारकाची जबाबदारी आहे, हे विशेष.
कश्मीरची फाळणी
नव्या राज्य पुनर्रचनेत लेह-लडाख जम्मू-कश्मीर राज्यातून वेगळे केले. लडाखमध्ये आता सरकार नाही व दिल्लीने लादलेली नोकरशाही राज्य करीत आहे. लडाख हा प्रदेश पंजाब आणि कश्मीरपेक्षा मोठा आहे हे भारतीयांनाच माहीत नाही. लडाख फक्त जमिनीचा तुकडा असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी ही विशेष माहिती आहे. कारगील हा लडाखचा भाग. सिंधू नदी ही लडाखची मुख्य नदी. ही नदी लेह शहरातून पुढे पाकिस्तानात प्रवेश करते. कारगीलच्या सीमा थेट पाकिस्तानशी जोडल्या आहेत. सैन्य अधिकाऱ्याने समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून सांगितले, “तो तिरंगा वर फडकतोय आणि खाली हिरवा झेंडा दिसतोय ही सीमारेषा. ही नदी वाहतेय. जिथपर्यंत आपला झेंडा फडकतोय तिथपर्यंत आपली. पुढे त्यावर पाकिस्तानचा हक्क. भारताच्या हद्दीतून वाहणारे पाणी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करते. पाण्यावर दोघांचा हक्क. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “सिंधू नदीचे पाणी रोखू” तसे काही घडले नाही. भारताच्या चौकीवरून दिलेला आवाज समोर पाकिस्तानी चौकीपर्यंत पोहोचतो. दोघांत एक सीमारेषा आहे. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. कारगीलच्या सीमेपलीकडचा दिसणारा पाकिस्तान म्हणजे पाकव्याप्त कश्मीर नाही. ज्याला आझाद कश्मीर म्हटले जाते तो हा भाग नाही. पाकव्याप्त कश्मीर हा पूर्णपणे वेगळा विषय. समोर दिसतोय तो पाकव्याप्त गिलगीट-बाल्टिस्तान आहे. गिलगीट-बाल्टिस्तानचे लोक स्वत:ला कश्मिरी मानत नाहीत. त्यांची भाषा व संस्कृती पूर्ण वेगळी. त्यांची भाषा शिना आणि बाल्टी. या दोन्ही प्रदेशांवर पाकिस्तानचा ताबा आहे. कधीकाळी हा भारताचा भाग होता. पंतप्रधान मोदी जेव्हा पाकच्या ताब्यातील कश्मीर जिंकतील तेव्हा गिलगीट-बाल्टिस्तानसाठीही त्यांना लढावे लागेल आणि तेव्हाच अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण होईल. त्या भूमीवर आज पाकिस्तानचा झेंडा फडकताना पाहिले व त्या दिशेने भारतीय सैन्याच्या बंदुका सदैव रोखलेल्यादेखील दिसल्या. लडाखच्या भूमीवर हे सर्व पाहता आले. लडाखच्या बाजारात व रस्त्यावर इराणचे शहीद सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनींची पोस्टर्स लागली आहेत. अनेक घरांवर, दुकानांवर ही पोस्टर्स झळकली हे कसे? “येथे बहुसंख्य शिया मुसलमान आहेत. खामेनी त्यांचेही सुप्रीम लीडर आहेत. येथे एक आश्चर्य घडले. सुप्रीम लीडरच्या हत्येनंतर कश्मीर लडाखमधील शिया-सुन्नी एकत्र आले व त्यांनी निषेध केला,” अशी माहिती प्रशासनाने दिली. कश्मीरपासून लडाख आज पूर्ण तुटलेले आहे. पंख तुटलेल्या घारीसारखे ते अस्वस्थ आहे. 370 कलम हटवल्याने लडाखची जमीन भाजपच्या ‘लॅण्ड माफियां’साठी मोकळी झाली. येथील जमिनी आदिवासींच्या आहेत. त्यावर आता ताबा मिळवला जाईल. “तुम्हाला कोणाची भीती वाटते?” यावर “अदानीची” असे उत्तर मिळाले. लडाखच्या भूमीवरील पॉवर ग्रीडवर ताबा मिळवण्यासाठी 370 हटवले. पॉवर ग्रीडवर अदानींची नजर आहे व 370 हटवण्यामागचा डाव हाच आहे ही भावना लडाखवासीयांची आहे. ‘लडाखची संपत्ती, जमिनी, जंगलांची आता लूट होईल. त्यामुळे भारतीय संविधानातील सहावी अनुसूची (Sixth Schedule) येथे लागू करावी. त्यामुळे बाहेरच्या लोकांना इथे येऊन आमच्या जमिनी लुटता येणार नाहीत. आमच्या संस्कृतीचे संरक्षण होईल. लडाखचा स्वाभिमान टिकवता येईल. सोनम वांगचुक यांनी याच मागणीसाठी लडाख भूमीवर आंदोलन केले, तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवून तुरुंगात टाकले, असे सांगणारे भेटले. कश्मीरप्रमाणे लडाखी तरुणांचेदेखील प्रश्न आहेत. लडाखला अजून स्वत:चे विद्यापीठ नाही. जम्मू-कश्मीरचा भाग असताना लडाखच्या विद्यार्थ्यांना जम्मू-कश्मीरच्या विद्यापीठात, कॉलेजात प्रवेश मिळत होता. आता ते बंद झाले. डोमिसाईल सर्टिफिकेटचीही समस्या निर्माण झाली आहे.
सरकार राजकीय फायद्यासाठी राज्य तोडते, लोकांत विभागणी करते व पुढे हे सगळे अधांतरी सोडून पुढच्या राजकारणाकडे वळते!
कश्मीर-लडाखमध्ये असेच ‘अधांतरी’ राजकारण चालले आहे.
गृहमंत्री अमित शहांचा आता कश्मीर, लडाखमधील इंटरेस्ट संपला आहे. तरीही लोकांनी शांत राहावे. बंड केले तर देशद्रोही ठराल. पार्वतीच्या प्रदेशात संताप, राग, चीड यांवर बंदी आहे!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]





























































