
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विशेष धोरण लागू करून वाढीव एफएसआय मंजूर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत ४५० हून अधिक धोकादायक, तर २२५ अतिधोकादायक इमारती घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व इमारती अधिकृत असतानाही त्यांच्या पुनर्विकासासाठी ठोस आणि व्यवहार्य धोरण नसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर संभाव्य दुर्घटनांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीतील शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, प्रतोद संकेश भोईर, नीलेश खंबायत, विशाल गारवे, रूपेश भोईर, प्रदीप साळवी या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन याप्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली.
शिवसेनेने सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, अनधिकृत बांधकामांसाठी विविध सवलती आणि योजना राबवल्या जात असताना अधिकृत धोकादायक इमारतींतील रहिवाशांना न्याय मिळत नाही. विशेषतः सहा मीटर व नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास सध्याच्या कमी एफएसआयमुळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. भाडेकरू, पोटभाडेकरू, पागडीधारक यांना पुनर्विकासात योग्य घरे देण्यासाठी वाढीव एफएसआयची आवश्यकता आहे. तसेच शहरातील नऊ मीटर रुंदीचे रस्ते बारा मीटर करण्याबाबतही ठोस निर्णय घेण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे.
ठाणे पालिकेच्या धर्तीवर निर्णय घ्या
ठाणे महापालिकेच्या धर्तीवर केडीएमसी क्षेत्रात अतिरिक्त एफएसआय, इन्सेंटिव्ह एफएसआय, प्रीमियम रिलॅक्सेशन तसेच यूडीसीपीआर नियम ७.६ अंतर्गत एफएसआय मंजूर करण्यात यावा. यामुळे धोकादायक इमारतींचा पुनर्विकास गतिमान होऊन नागरिकांना सुरक्षित निवास उपलब्ध होऊ शकणार असल्याचे गटनेते उमेश बोरगावकर म्हणाले.



























































