
टी-20 मुंबई लीगमधील सुपर ओव्हरच्या थरारात अजिंक्य रहाणेच्या नॉर्थ मुंबई पँथर्सने बांद्रा ब्लास्टर्सवर मात केली. सुपर ओव्हरमध्ये वैभव माळीने दोन षटकार आणि एक चौकार मारून पँथर्सला एक बाद 20 अशी धावसंख्या उभारण्यास मदत केली. प्रत्युत्तरात ब्लास्टर्सला फक्त बिनबाद 7 धावाच करता आल्या आणि त्यांचा पराभव झाला.
ब्लास्टर्सचा कर्णधार सुवेद पारकरने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावत ब्लास्टर्सला 228/5 या भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले. ही स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. सुवेदने 54 चेंडूंमधील शानदार 110 धावांची खेळी साकारली. हार्दिक तामोरने 39 चेंडूंमध्ये 83 धावा करत आपला स्फोटक खेळ कायम ठेवला, पण त्यानंतर तनुष कोटियनच्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीमुळे पँथर्सला त्याच धावसंख्येवर समाधान मानावे लागले, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
तत्पूर्वी, ब्लास्टर्सने शानदार सुरुवात केली. पारकर आणि प्रतीककुमार रविशंकर यांनी सलामीच्या विकेटसाठी अवघ्या आठ षटकांत 101 धावा ठोकल्या. पारकरने ऑफस्पिनर तनुष कोटियनच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार ठोकून अवघ्या 46 चेंडूंमध्ये शानदार शतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक – बांद्रा ब्लास्टर्स 5 बाद 228 (सुवेद पारकर 110, प्रतीककुमार रविशंकर 33, जय जैन नाबाद 288, ध्रुमिल मटकर 28; प्रतीक मिश्रा 3/38) बरोबरी विरुद्ध नॉर्थ मुंबई पँथर्स 8 बाद 228 (हार्दिक तामोरे 83, अभिज्ञान कुंडू 39, तनुष कोटियन नाबाद 32; सागर छाबरिया 3/9).
सुपर ओव्हर – नॉर्थ मुंबई पँथर्स 1 बाद 20 (वैभव माळी 19) विजयी विरुद्ध बांद्रा ब्लास्टर्स बिनबाद 7 (ध्रुमिल मटकर नाबाद 6, सुवेद पारकर नाबाद 1).

























































