
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धानंतर हिंदुस्तानात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना चुली पेटवाव्या लागल्या होत्या. गॅस सिलिंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आजही हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहेत. ग्रामीण भागात आगोटमध्ये चुलीसाठी जसं सरपण गोळा करतात तसेच आगोटचे सरपण रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांनी भरून ठेवले आहे.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यानंतर रत्नागिरीत काही हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. काही हॉटेल व्यावसायिकांनी पर्याय शोधत चुली पेटवल्या. चुलीसाठी इंधन म्हणून लाकडं गोळा केली. मर्यादित मेनू ठेवत हॉटेल व्यवसाय सुरु ठेवला. आता जरी व्यवसायिक गॅस सिलिंडर मिळत असला तरी तुटवडा कायम आहे. त्यामुळे अनेक हॉटेलात आजही चुलीवरच अन्न शिजत आहे. पावसाळ्यात गॅस सिलिंडर नाही मिळाला तर काय करायचं? असा पेच पडल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांनी चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करून ठेवली आहेत. कोकणात ग्रामीण भागात आगोटची तयारी केली जाते. पावसात चूल पेटवण्यासाठी गावकरी लाकूडफाटा गोळा करतात. रत्नागिरीतील अनेक हॉटेल्सने आगोटची तयारी करत चूलीसाठी लाकूडफाटा गोळा करून ठेवला आहे.

























































