
एसटी महामंडळाच्या महसुलावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत विभागातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ची प्रभावी अंमलबजावणी करून खासगी वाहनांचा प्रवेश रोखण्यात येणार आहे. या हेतूने 15 जूनपर्यंत कारवाईची धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या निकालाला अनुसरून सरकारने एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरातील क्षेत्र खासगी वाहनांसाठी ‘निषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने धडक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबई विभागातील प्रमुख बसस्थानकावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात मुंबई, परळ, दादर, कुर्ला, पनवेल, उरण आगार तसेच मैत्री पार्क, वाशी, नेरुळ, कामोठे या प्रवासी थांब्याचा आणि बसस्थानकांचा समावेश आहे. एसटी बसस्थानक परिसरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. तसेच अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय व सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे कारवाई तीव्र करणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
अधिकाऱ्यांची फौज तैनात राहणार
मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांची कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी विभागीय पातळीवर सुरक्षा व दक्षता अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक अशी अधिकाऱ्यांची फौज तैनात राहणार आहे. बस स्थानकांच्या आवारातील इतर अनैतिक गोष्टींनाही चाप लावणार आहेत.


























































