
दापोली शहरातील कोकंबाआळी येथे एका मादी वानराला आपल्या चिमुकल्या पिल्लासह विजेचा जोरदार धक्का लागल्याची दुर्दैवी घटना घडली. विजेच्या धक्क्याने हे वानर मायलेक गंभीर जखमी अवस्थेत विद्युत खांबाजवळ वेदनेने विव्हळत पडले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्राणीमित्रांच्या प्रसंगावधानामुळे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या दोन्ही जिवांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
सध्या दापोली शहर आणि ग्रामीण भागात वानरांचा वावर प्रचंड वाढला आहे. वानरांच्या मर्कटलीलांमुळे बागायतदारांच्या फळबागांचे आणि घरांच्या परसातील झाडांचे मोठे नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर घरांची कौले उचकटणे, सिमेंट पत्र्यांची मोडतोड करणे आणि घरात घुसून अन्नाची पातेली पळवून नेण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. असे असतानाही, बुधवारी सकाळी कोकंबाआळी येथे झाडांवरून उड्या मारताना एका मादी वानराचा पिल्लासह विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि दोघेही खाली कोसळले. ही बाब सामाजिक कार्यकर्ते तथा तालुक्यातील प्रसिद्ध ‘बाल उत्साही कार्यकारी मंडळाचे’ अध्यक्ष संजय घाडगे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच दापोली वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी वर्गाने कसलाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी वानर आणि त्याच्या पिल्लाला ताब्यात घेऊन तातडीने दापोलीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करून घेतले. औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत वानर मायलेक बरे झाल्यानंतर, वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांना सुखरूपपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. माणुसकीचे दर्शन घडविणारे हे कौतुकास्पद काम दापोलीचे वनपाल रामदास खोत, खेर्डीचे वनरक्षक विश्वंभर झाडे आणि वनरक्षक पी. एस. साबणे यांनी केले असून, त्यांच्या या संवेदनशील कामगिरीबद्दल प्राणीमित्रांसह संपूर्ण तालुक्यातून समाधान आणि कौतुक व्यक्त होत आहे.


























































