मेगाब्लॉक संपूनही प्रवाशांचे हाल, मध्य रेल्वेच्या स्थानकांत दिवसभर गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटीशकालीन शीव उड्डाणपुलावर गर्डर्स बसवण्यासाठी मध्य रेल्वेने सलग दोन रात्रकालीन ब्लॉक घेतले आणि ते काम पूर्ण केले. मात्र मेगाब्लॉक संपूनही रविवारी लोकल वाहतुकीच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला होता. परिणामी, सर्वच स्थानकांत दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनाही धक्के सोसत लोकलचा प्रवास करावा लागला.

मध्य रेल्वेने प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाच्या अनुषंगाने शीव पुलावर गर्डर्स बसवण्यासाठी दोन रात्रकालीन ब्लॉक घेतले होते. त्यानुसार शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री माटुंगा-कुर्लादरम्यान विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. या दोन ब्लॉकनंतर रविवारच्या सुट्टीत ’निर्विघ्न’ प्रवास करता येईल, या अपेक्षेने प्रवासी घराबाहेर पडले होते. मात्र प्रत्यक्ष मध्य रेल्वे मार्गावर प्रवास सुरू करताच प्रवाशांना रखडपट्टीला तोंड द्यावे लागले. अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात आल्याने 30 ते 40 मिनिटे स्थानकात गाडी येत नव्हती.