खोपोली नगर परिषदेच्या बोगस पावत्या बनवून ३३ लाख हडपले, दोन कर्मचाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोपोली नगर परिषदेच्या बोगस पावत्या बनवून ३३ लाख रुपये हडप केल्याप्रकरणी पोलिसांनी रजनीकांत मुसळे आणि सोमीनाथ तुपे या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींनी शहरातील चार बांधकाम व्यावसायिकांकडून सुमारे ३३ लाख रुपयांची रक्कम घेऊन त्यांना खोट्या पावत्या दिल्या आणि ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी हडप केली होती.

खोपोली नगर परिषदेत झालेल्या पावती घोटळ्याप्रकरणी रजनीकांत मुसळे, विजय खंडागळे आणि सोमीनाथ तुपे यांच्याविरोधात प्रशासनाने तक्रार केल्यानंतर खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता तिन्ही आरोपींचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुसळे आणि तुपे यांना गजाआड केले आहे. या आरोपींनी १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान बांधकाम व्यावसायिक इसाक सय्यद यांच्याकडून ११ लाख ४५ हजार १८६ रुपये, दीपेंद्रसिंग भदोरिया यांच्याकडून ८ लाख ९२ हजार ५४६ रुपये, राजेश जैन यांच्याकडून ८ लाख २२ हजार ६८ रुपये आणि भूषण पांढरे यांच्याकडून ४ लाख ३५ हाजर ७६५ रुपये नगर परिषदेमध्ये भरणा करण्यासाठी घेतले. ही रक्कम नगर परिषदेत जमा केल्याच्या पावत्याही त्यांनी संबंधित बिल्डरांना दिल्या.