
कर्नाटकमध्ये विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने एक जागा जास्त जिंकून आणली आहे. भाजपमधून हकालपट्टी झालेल्या तीन आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री शिवकुमार यांनी भाजप-जेडीएस युतीची तिसरी जागा खेचून आणली. या अंतर्गत बंडाळीची गंभीर दखल घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना समन्स धाडले आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
BJP president Nitin Nabin summons Karnataka BJP chief Vijayendra Yediyurappa, other party leaders over cross-voting in state MLC polls. pic.twitter.com/NJ24TA6hZt
— Press Trust of India (@PTI_News) June 19, 2026
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 7 जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने 7 पैकी तब्बल 5 जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. जेडीएसचे एकमेव उमेदवार गोविंदराजू यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
विधान परिषद निवडणुकीत संख्याबळानुसार सत्ताधारी काँग्रेसला स्वबळावर 140 मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसच्या उमेदवारांच्या झोळीत तब्बल 151 मते पडली. विरोधी पक्षातील 11 आमदारांनी थेट काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे. भाजपचे 3 आमदार आणि जेडीएसच्या 8 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून काँग्रेसला मतदान केले. तर भाजपच्या एका आमदाराचे मत अवैध ठरले.
कर्नाटकातील अंतर्गत बंडाळीची गंभीर दखल घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना समन्स बजावत इतर प्रमुख नेत्यांना दिल्लीला पाचारण केले आहे. यावरून 23 जून रोजी होणाऱ्या तातडीच्या बैठकीत दोषी आमदारांवर कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, समन्स मिळालेले प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. क्रॉस-व्होटिंग नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी केले, याची सविस्तर माहिती आम्ही घेत आहोत. अहवाल समोर आल्यानंतर पक्ष यावर अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात काँग्रेसने केला भाजपचा गेम; विधान परिषद निवडणुकीत मारली बाजी





























































