विमानतळावरून ६ कोटी ६५ लाखांचा गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून सुमारे ६ कोटी ६५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या प्रकरणी तेजिंदर गाबा आणि रोहन महाले या दोघांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री हवाई गुप्तचर विभागाचे पथक विमानतळावर गस्त करत होते. तेव्हा तेजिंदर आणि रोहन हे दोघे बँकॉक येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले असता रोहनच्या बॅगेत ११ छोटी पाकिटे आढळून आली. त्या पाकिटात हायड्रोपोनिक गांजा होता. त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ६ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. तेजिंदर आणि रोहन विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्या दोघांना हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.