कर्जतमध्ये मुरुममाफियांना दणका; चार डंपर, एक जेसीबी जप्त, वनविभागाची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर लाल माती (मुरुम) उत्खननाविरोधात वनविभागाने धडक कारवाई करत मातीमाफियांना मोठा दणका दिला आहे. कर्जत पश्चिम वनपरिक्षेत्रातील पोही परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत चार डंपर आणि एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

माती उत्खननामुळे डोंगरांचे अस्तित्व धोक्यात आले असून नैसर्गिक जलप्रवाह, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम झाल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन केले जात असल्याने पावसाळ्यात भूस्खलन, धूप आणि पूरपरिस्थितीचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या पथकाने पोही परिसरात अचानक छापा टाकत सुरू असलेले उत्खनन उघडकीस आणले. कारवाईदरम्यान चार डंपर आणि एक जेसीबी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे मातीमाफियांचे धाबे दणाणले आहेत. पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रात्रीस खेळ चाले

कळंब डोंगराळ व वनक्षेत्रालगतच्या भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू आहे. उत्खननातून काढलेली माती रात्रीच्या वेळी डंपरच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पांकडे वाहतूक केली जात होती.