अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावावर जीवघेणा हल्ला; जुन्या वैमनस्यातून शेजाऱ्यानेच रचला कट, प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी यांचे मोठे भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर जुन्या वैमनस्यातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या भीषण हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला बिजेंद्र माधोपूर परिसरातील बेलसंड गावात झाला. बिजेंद्र तिवारी यांच्या शेजारच्या व्यक्तीनेच पूर्ववैमनस्यातून हा पूर्वनियोजित हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून कमालीची शांतता पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा तातडीने शोध घेत आहेत.

एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर अशा प्रकारे भरदिवसा हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने फिरवली असून आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक तैनात केले आहे. पोलिसांनी काही संशयित आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते असून ते मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढत ते अनेकदा आपल्या गावी येत-जात असतात. मात्र, त्यांच्याच भावावर गावातील जुन्या वादातून असा जीवघेणा हल्ला झाल्याने सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या हल्ल्यामागील नेमके मुख्य कारण काय होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.