
महाजेनकोच्या औष्णिक वीज निर्मितीच्या 1600 मेगावॉट क्षमतेच्या 10 युनिट्स 2030 पर्यंत बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत. याचबरोबर अदानी पॉवरकडून प्रतियुनिट 5.30 रुपयांच्या दराने इतक्याच क्षमतेची वीज खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. अदानीकडून वीज खरेदी करण्यासाठी सरकारी कंपनी महाजेनकोच्या काही वीजनिर्मिती युनिट्स बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महावितरणने कमी दरातील विजेसाठी नव्या कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत अदानी पॉवरसोबत जिंदल पॉवर, टोरेंट पॉवर, ललित पॉवर आणि एम.बी. पॉवर यांनीही सहभाग घेतला होता. अदानी पॉवरने सुरुवातीला प्रतियुनिट 5.49 रुपयांचा दर सादर केला होता. मात्र इंधन शुल्कात 13.75 टक्के सवलत देत कंपनीने हा दर 5.30 रुपये प्रतियुनिटपर्यंत कमी केला. हा दर सर्वांत कमी ठरल्याने अदानीची निविदा मंजूर करण्यात आली. याचबरोबर आयोगाने महाजेनकोच्या 10 युनिट्सचे पॉवर परचेस अग्रीमेंट (पीपीए) 2030 पर्यंत समाप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे युनिट्स बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, या युनिट्समधून तयार होणाऱया विजेचा उत्पादन खर्च प्रतियुनिट 6.14 रुपये ते 6.77 रुपये इतका आहे, जो अदानी पॉवरच्या प्रस्तावित दरापेक्षा अधिक आहे.
स्वस्त विजेचा दावा
आयोगाच्या या निर्णयामुळे स्वस्त वीज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. महाजेनकोच्या ज्या औष्णिक वीज केंद्रांचा वीज खरेदी करार संपुष्टात येणार आहेत, त्या युनिट्सचा उत्पादन खर्च जास्त आहे. अदानी पॉवरकडून तुलनेने कमी दरात वीज मिळणार असल्याने वीजदर नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असा दावा अधिकाऱयांनी केला आहे.
संघटनांचा आंदोलनाचा इशारा
ऊर्जा क्षेत्रातील कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱयांच्या रोजगारावर गदा येईल. या निर्णयाविरोधात उपोषणासह आंदोलन करण्यात येईल. निर्णय मागे घेतला नाही, तर संपाचाही मार्ग स्वीकारावा लागेल, असे वर्कर्स फेडरेशनचे महासचिव कृष्णा भोयर यांनी सांगितले.
या युनिट्सवर लागणार टाळे
वीज केंद्र युनिट क्रमांक क्षमता
भुसावळ 3 210 मेगावॉट
खापरखेडा 1 आणि 2 420 मेगावॉट
नाशिक 3, 4 व 5 630 मेगावॉट
चंद्रपूर 3, 4, 5 व 6 340 मेगावॉट






























































